Menubar

स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश 💫🥇🥇🥇✨ अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कुरुल ता.मोहोळ, जि. सोलापूर. NMMS परीक्षा निकाल 2025 --- NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी--05 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 07 दोन्ही मिळून -12 विद्यार्थी 🥇🥇🥇 5 विद्यार्थ्यांना 60,000 रू प्रमाणे = 300,000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार.🥇🥇🥇 🏆 सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -07🏆 प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे *268,800 रू *शिष्यवृत्ती मिळणार 🏆🥇🥇🥇💐✌👍👍 🏆 एकूण 5,68,800 रू शिष्यवृत्ती मिळणार!!!! 🏆 ✌ NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी 1) जाधव ओंकार ज्ञानदेव ( जिल्ह्यात प्रथम) 2) जाधव प्रणव पोपट 3) जाधव विश्वजीत संजय 4) बंदपट्टे साई शंकर 5) कांबळे नारायण बाळू सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी...... 1) कु. मोहिते शितल विलास 2) कु. चव्हाण सृष्टी सुहास 3 ) कु. घोडके सिद्धी रामचंद्र 4 ) कु.लांडे समीक्षा लक्ष्मण 5) कु. पवार अंकिता अमोगसिद्ध 6)कु. सरवळे संस्कृती आण्‍णासो 7)कु. साळुंखे हर्षदा हनुमंत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, विभागीय अधिकारी मा.श्री. जगदाळे साहेब साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. दाभाडे साहेब,निकम साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री विलासकाका पाटील, सदस्य श्री शत्रूतात्या जाधव, सदस्य श्री लिंगेश्वर निकम , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , पर्यवेक्षक श्री.काटकर सर, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले. ✌🌹🥇🥇🏆🏆.

Friday, May 8, 2020

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !!!



ज्ञानगंगेचा भगीरथ...

             पुराणामध्ये भगीरथाची गोष्ट सांगितली जाते. पूर्वजांच्या उद्धारासाठी चौदा वर्षे तपश्चर्या करून स्वर्गातील गंगा पृथ्वीवर आणली म्हणे त्याने... पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून वंचित असलेल्या तळागाळातील गोरगरीब बहुजनांच्या झोपडीपर्यंत ज्ञानाची गंगा पोहचवण्याचे थोर कार्य आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे तब्बल चाळीस वर्षे बहुजन उद्धाराचे महत्कार्य करणाऱ्या आधुनिक भगीरथाचे उदाहरण मात्र आपल्यासमोर आहे. असा हा रयतेचा अजिंक्यतारा म्हणजे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील.

             घरी आलेल्या पाहुण्यांच्या समोर "मुलगा फक्त दोन वेळचे खातो आणि गावभर फिरतो," हा वडिलांनी केलेला अपमान तोंडातल्या घासाबरोबर गिळला असला; तरी मानी पत्नीच्या डोळ्यांतून ओघळलेल्या दोन थेंबांनी मात्र भाऊरावांना आतून बाहेरून हलवून टाकले. घरातून बाहेर पडून ते सातारला येऊन शिकवणी घेऊ लागले. तेथून ते पाटील मास्तर म्हणून ओळखले जाऊ लागले.

            वर्गाच्या बाहेर बसून शिकणाऱ्या ज्ञानदेव घोलप नावाच्या दलित विद्यार्थ्याला तडक खांद्यावर घेऊन त्याच्या शिक्षणाची व्यवस्था लावून देणाऱ्या भाऊरावांनी प्रचलित समाजव्यवस्थेविरूद्ध बंडाचा झेंडा हाती घेतला. सत्यशोधक विचारांच्या मुशीत तयार झालेल्या भाऊरावांपुढे महात्मा ज्योतिराव फुले आणि राजर्षि शाहू महाराजांचा आदर्श होता. प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या सहवासात शिक्षणाचे नवे स्वप्न आकाराला येऊ लागले.

             काही मित्रांच्या सोबतीने उभी केलेली दूधगाव शिक्षण प्रसारक मंडळी ही रयत शिक्षण संस्थेची पायाभरणीच होती. वेगवेगळ्या समाजातील मुलांसाठी एकच वसतिगृह हा क्रांतिकारक निर्णय होता. वेगवेगळ्या जातिधर्माची मुले एकाच छताखाली येऊन शिकू लागली. सातारच्या धनिणीच्या बागेत उभे राहिलेले शाहू बोर्डिंग हे क्रांतिकारक स्मारक आहे. तोपर्यंत गरीबाघरची मुले माधुकरी मागून शिकत होती. पण अण्णांच्या स्वाभिमानी मनाला हे पटणारे नव्हते. स्वावलंबी शिक्षणाचा मूलमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कमवा आणि शिका या ब्रीदाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मन, मनगट आणि मेंदूचा विकास केला. हातावर असलेला घट्टा ही खर्‍या विद्यार्थ्यांची खूण होती. काले या ठिकाणी काढलेली पहिली शाळा म्हणजे अण्णांनी लावलेले इवलेसे रोपटे होते. आपल्याजवळ असले नसलेले सर्व काही अण्णांनी या मुलांसाठी अर्पण केले. अंगावर वजनाइतके सोने घेऊन आलेल्या पत्नीलाही लंकेची पार्वती करून टाकले. या गोरगरिबांच्या पोरांसाठी खांद्याला झोळी अडकवून गावोगाव फिरून मदत गोळा केली. एक मूठ धान्य आणि एक रुपया अशी थेंबाथेंबाने मदत गोळा करताना त्यांनी पायातली पायताणं झिजवली. आज तेच इवलेसे झाड महावृक्ष झाले आहे. वडाच्या झाडाची एक गंमत असते. त्याची पारंबी जिथे जमिनीला टेकते; तिथे नवीन झाड तयार होते. आज अण्णांनी लावलेल्या एका फांदीपासून मोठा वटवृक्ष उभा राहिला.

संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते अगदी महात्मा गांधीनीही अण्णांच्या या कामाची दखल घेतलेली होती. "साबरमतीमध्ये जे मी करू शकलो नाही, ते भाऊरावांनी येथे करून दाखवले." अशी पोचपावतीच त्यांना मिळाली.
            आज 438 माध्यमिक, 42 महाविद्यालये, 51 प्राथमिक, 33 पूर्वप्राथमिक, 7 अध्यापक विद्यालये, 91 वसतिगृहे, 8 आश्रमशाळा, 2 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, 1 रयत इन्स्टिट्युट आॕफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट, 57 इतर शाखा, 17 शेतीशाळा, 7 प्रशासकीय कार्यालये, 1 बँक अशा पाच विभागात पंधरा जिल्ह्यात पसरलेल्या या वटवृक्षाच्या एकूण 737 पारंब्या असून 4,58,044 विद्यार्थी आणि 16172 सेवकवर्ग असा पसारा घेऊन अण्णांनी लावलेला हा वटवृक्ष महाराष्ट्रातील नव्हे, देशातील नव्हे; तर आशिया खंडातील सर्वांत मोठी व अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून शंभरी पूर्ण करत आहे. Quantity कडून Qualityकडे आज होत असलेली वाटचाल पाहता कोणत्याही सामन्यातील कोणत्याही खेळाडूने ठोकलेल्या शतकापेक्षा आज संस्थेने केलेली शतक महोत्सवी वाटचाल ही कित्येक पटीने श्रेष्ठ आहे. फक्त आता आपली सर्वांचीच अगदी सेवकांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत अगदी सर्वांचीच जबाबदारी आहे की, त्यागातून उभारलेल्या या वटवृक्षाला तेवढ्याच सात्त्विकपणे व स्वच्छपणे जपले पाहिजे.

           आज या वडाचे एक पान म्हणून एक सेवक म्हणून मला अभिमान आहे. या वडाचीच एक पारंबी असलेल्या न्यू इंग्लिश स्कुल कुरुलच्या वतीने या वटवृक्षाला व त्याच्या जन्मदात्या शिक्षणमहर्षि कर्मवीर अण्णांना त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन...!!!

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"